मस्साजोगची पोटनिवडणूक चूरशीची होणार
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदाच्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यानंतर मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेला दिनांक ७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ९ एप्रिलला सकाळी अकरा वाजता केज तहसील कार्यालयात सरपंच पदासाठीचा निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
एस.पी. साहेब; केज पोलिसांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींचा जीव गेला – सविस्तर बातमी
गावातील अन्य इच्छुक उमेदवार स्वरूपानंद देशमुख हेही सरपंच पदासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे मस्साजोगची निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची लढत होणार आहे. किती इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कोणाला निवडून देणार, गावचा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वरूपानंद देशमुख म्हणाले, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार नाही. मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ज्यांचा गावाशी काही संपर्क नाही अशा लोकांनी गावात येऊन बिनविरोध निवडणूक होणार आहे. असं म्हणून बिनविरोध निवडणूक होणार नाही. मी त्यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या विरोधात उभा राहिलो होतो. त्यावेळी माझा सरपंच पदासाठी ९ मतांनी पराभव झाला होता. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती, त्यांच्या निधनांतर मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक १८ महिन्यांसाठी होत आहे. १३ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पोट निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. कालपासून मीडियामध्ये बातमी येत आहे, निवडणूक बिनविरोध होणार असं काही होणार नाही. निवडणूक बिनविरोध करायची किंवा नाही करायची निवडणूक बिनविरोध करीत असताना गावातील सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन बिनविरोध निवड चर्चा केली पाहिजे. गावातील दहा-वीस लोकांना सोबत घेऊन चर्चा करून बिनविरोध निवडणूक होत नसते.
निवडणूक बिनविरोध होणार हे लहानातील लहान ज्याला मतदानाचा हक्क आहे. त्याला समोर बसून त्यांच्या काही भावना आहेत, विचार आहेत ते समजून घेऊन निवडणूक बिनविरोध होत असते. मी कालच माझा उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. मी या निवडणुकीचा उमेदवार शंभर टक्के आहे. जरी गावकऱ्यांनी बैठक बोलावली तरी त्यावेळेस विनंती करणार आहे. यावेळेस माझी सुद्धा इच्छा आहे सरपंच पदासाठी मला बिनविरोध निवडून द्यावे. 18 महिन्याचा कालावधी कालच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाने लहान लेकरा पासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे काल बी होतात आज बी आहेत. आम्ही फक्त न्यायालय प्रक्रियेत त्यांच्या पाठीमागे आहोत. राजकीय भूमिकेत आमची भूमिका वेगळी असेल. त्यांची भूमिका वेगळी असेल. माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या निवडणुकीपासून लांब राहावे . जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राजकारणामध्ये येऊ नये. परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. कोणाला उभारायचं ते मी त्यांना सांगू शकत नाही.





















