दागिन्यांसह मालमत्तेची कागदपत्रे जप्त – पोलिस निरीक्षकाची होणार चौकशी
marathinews24.com
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी (दि. २) रंगेहात पकडले. प्रमोद रविंद्र चिंतामणी (४४, रा. ५०४, सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी, मुळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोमवारी (दि. ३) एसीबीच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता ५१ लाख रुपये रोख सापडले आहेत. पैशांसह दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे एसीबीने जप्त केली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांची देखील एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
कुख्यात आंदेकर टोळीविरूद्ध आणखी एक मोक्का – सविस्तर बातमी
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद चिंतामणी याने २ कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेताना
एसीबीने त्याला रंगेहात पकडले. रात्री उशीरा याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी त्याच्या घरझडतीत मिळालेल्या रोख रकमेसह अन्य कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरु होती. पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात एवढी मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चिंतामणी याने लाचेची मागणी करताना १ कोटी त्याच्यासाठी व १ कोटी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी मागितले होते, त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड सह अनेक मोठ्या शहरातील आर्थिक गुन्हे शाखेत गुंतवणुकीच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरु असतो. कागदपत्रे किचकट असल्याच्या नावाखाली अनेकदा केवळ गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कारवाई करताना फिर्यादीला जेरीस आणले जाते. आरोपींना वेगवेगळ्या प्रकारे सुट देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम मागितली जात असल्याचे बोलले जाते. प्रमोद चिंतामणी याच्यावरील कारवाईमुळे ही सत्यता समोर आली.




















