महिलेची जमीन बळकावून २५ लाखांची खंडणी
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर भागात सय्यदनगरमध्ये दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पठाण आणि साथीदारांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली असून, याप्रकरणी पठाणसह साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरणाऱ्या महिला गजाआड – सविस्तर बातमी
तक्रारदार महिला मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इराफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे. गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी महिलेच्या जागेवर बेकायदा पत्र्याची शेड बांधली. या जागेचा ताबा घेऊन एकाला भाड्याने वापरास दिली. पठाण आणि साथीदार त्याच्याकडून दरमहा जागेचे भाडे घेत होते. महिलेने पठाण टोळीला जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले. तेव्हा पठाणने महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर जागेवरचा ताबा सोडतो. पुन्हा या भागात आला तर जीवे मारु, अशी धमकी पठाणने दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिग पाटील तपास करत आहेत.
पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते.
कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, दूरचित्रवाणी, धुलाई यंत्र, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





















