रोटरी क्लब ऑफ पुणे रौप्य महोत्सव सांगता सोहळा
marathinews24.com
पुणे – समाजोपयोगी काम हाती घेताना, ते साकारण्याचे मोठे, विशाल स्वप्न पहा. स्वप्ने पाहताना काळाच्या चौकटीची पर्वा करू नका. सकारात्मक कार्याची परिपूर्ती काळाच्या पटलावर नक्कीच होते. त्यामुळे आपली स्वप्ने विशाल आणि मोठी ठेवा, असे आवाहन रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष रोटोरियन शेखर मेहता यांनी केले. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब गांधीभवनच्या अध्यक्ष रोटेरियन अश्विनी शिलेदार, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, सचिव रोटेरियन शामल मराठे, रोटेरियन आणि कार्यक्रमाचे समन्वयक गणेश जाधव उपस्थित होते.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार ; २६ ते २८ सप्टेंबर कालावधीत पावसाचा जोर वाढणार – सविस्तर बातमी
प्रारंभी क्लबच्या २५ वर्षांतील विविध उपक्रमांची माहिती देणारी ध्वनि चित्रफीत दाखविण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या वाटचालीत ज्या संस्था, नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशा व्यक्तींचा व संस्थांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ गांधीभवनच्या ‘पसायदान’ या बुलेटीनचे तसेच ‘पढो भारत’ या प्रकल्पाच्या पोस्टरचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. ‘पढो भारत’ या प्रकल्पाद्वारे पुस्तक संकलन मोहीम राबविण्यात येणार असून या द्वारे संकलित झालेली पुस्तके गरीब मुलांना वितरित करण्यात येणार आहेत.
शेखर मेहता पुढे म्हणाले, देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, संशोधकांनी, समाज सुधारकांनी वेळोवेळी विशाल स्वप्ने पाहिली. ती साकार होण्याच्या दिशेने अखंडित काम केले. अनेक जण त्या स्वप्नांची परिपूर्ती स्वतःच्या हयातीत पाहू शकले नाहीत, पण ज्या समाजाच्या उन्नतीसाठी ते झटले, त्या समाजाने ती स्वप्ने साकार होताना अनुभवली, हे महत्त्वाचे आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे गेल्या २५ वर्षांतील कार्य उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे. यापुढेही क्लब सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्य करत राहील, असा विश्वास वाटतो.
प्रभुणे म्हणाले, समाज आणि देश प्रगतीच्या वाटा नक्कीच चालत आहे, पण अजूनही समाजातील काही घटक वंचित, मागास, अशिक्षित आणि अभावग्रस्त अवस्थेत जगत आहेत. स्त्रियांची स्थिती असहाय आहे. आपले पीडित, दलित, मागास, वंचित बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे. सन २०४७ पर्यंतचे देशाच्या विकासाचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले आहे. हा काळ अमृतकाळ आहे, अशी धारणा आहे. ती धारणा प्रत्यक्षात उतरवीणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. रोटरी क्लब गांधीभवनचे कार्य अमृतकाळाशी सुसंगत पद्धतीने सुरू आहे.
रोटेरियन अश्विनी शिलेदार म्हणाल्या, अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेक सेवा प्रकल्पांचा संकल्प केला आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी सीसीटिव्हीचे काम सुरू होत आहे. ‘भवानी’ या नावाने हा प्रकल्प सुरू होत आहे. तसेच या कार्याच्या उद्देशाशी तरुणाई जोडली जावी, यासाठी ‘कवच’ हा प्रकल्पही नुकताच सुरू झाला आहे.
दिव्यांगांसाठी ‘साऊंड गार्डन’ उभारण्याची योजना आहे. तसेच पर्यावरणाशी संबंधित कार्य आणि गाव दत्तक घेण्याचा उपक्रम सुरू आहे. तर रोटेरियन प्रसाद पुजारी यांनी आभार मानले. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



















