भरधाव मोटार चालक पीकअपला धडकला
marathinews24.com
पुणे – भरधाव वेगातील मोटर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे संबंधित वाहन थांबलेल्या पिकअप वाहनाला धडकले. त्यामुळे झालेल्या अपघातात तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अपघातात चौघेजण गंभीरित्या जखमी झाले आहेत.
मित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटक – सविस्तर बातमी
त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली आहे. हा अपघात १८ जूनला संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास जेजुरी-मोरगाव रोडवर श्रीराम ढाब्यासमोर झाला.
सोमनाथ रामचंद्र वायसे (रा. ता. पुरंदर) रामू संजीवनी यादव ( रा. नागरिक, ता. पुरंदर) अजय कुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश) अजित अशोक जाधव ( रा. कांजळे, ता. भोर, जि. पुणे) किरण भारत राऊत ( रा. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अश्विनी संतोष एस.आर. (रा. सोलापूर) अक्षय संजय राऊत (रा. झारगडवाडी, ता. बारामती) अनोळखी पुरुष( ओळख अद्याप निष्पन्न झाली नाही) अशी ठार झालेल्या नागरिकांची नावे आहेत. भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरीतील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ वायसे हे फ्रिज डिलिव्हरीसाठी आलेल्या पिकअप वाहनातून फ्रिज खाली उतरवत होते. त्यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात ७ पुरुष आणि १ महिला जागीच ठार झाले. तर एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाली आहेत. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला होता.
परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्यासह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णाला दाखल केले.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांचे मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत. जखमींवर शांताई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. – संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण