वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – गाणी ऐकत थांबलेल्या रिक्षा चालकाला बेदम मारहाण करून पसार झालेल्या गुंडाला वानवडी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. गेले तीन महिने सराइत पोलिसांना गुंगारा देत होता. ऋषीकेश सुनील बागुल (वय २७, रा. एसआरए वसाहत, शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रिक्षा चालकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तरुणावर हल्ला – सविस्तर बातमी
तक्रारदार रिक्षा चालक हा ४ जुलै रोजी एसआरए वसाहतीच्या आवारात रिक्षातील ध्वनीवर्धक यंत्रणेवर गाणी ऐकत थांबला होता. तो नातेवाईकांची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी आरोपी ऋषीकेश बागुल आणि साथीदार तेथे आले. त्यांनी रिक्षातील ध्वनीवर्धक यंत्रणा बंद करण्यास सांगितले. या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर बागुल आणि साथीदारांनी रिक्षा चालकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. रिक्षा चालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी बागुलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर बागुलबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी बागुल हा पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पसार झालेला बागुल हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वैजापूर बसस्थानक परिसरात सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. बागुल हा सराइत गुन्हेगारी असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध हडपसर, शिवाजीनगर, फरासखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णू सुतार यांनी ही कामगिरी केली.





















