28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह दांडियाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे रविवार, दि. 28 सप्टेंबर ते गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पुण्यात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि गुजरातमधील सांस्कृतिक परंपरांचा संगम साधत हा शारदोत्सव साजरा केला जाणार आहे. शारदोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे खजिनदार बिपिन पंडित यांनी दिली.
‘सीएसजे सुवर्ण सफर’ उपक्रमाचा शुभारंभ – सविस्तर बातमी
सरस्वती नदीच्या काठी असलेल्या गौड या गावी समाजाची पाळेमुळे रुजलेली असून यातूनच या समाजाला गौड सारस्वत ब्राह्मण अशी ओळख मिळाली. उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) समाज अनेक प्रांतांमध्ये विखुरला गेला. महाराष्ट्रातही गौड सारस्वत ब्राह्मण समाजाची संख्या लक्षणीय असून पुण्यातही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. समाजाच्या एकत्रिकरणासाठी पुण्यात जीएसबी संयुक्त कोंकणी सभेची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. समाजातील रूढी-परंपरा पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी या वर्षी शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचा शारादोत्सव नवरात्र कालावधीतील पंमची ते दशमीदरम्यान शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असतो.
महोत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमात प्रार्थना, सुप्रभात भजन, प्राणप्रतिष्ठापना, पंचदुर्गा, चंडिका हवन, कन्यापूजन, सुहासिनी पूजन, श्री सुक्त हवन, रामनामतारक मंत्र हवन, तुलभारसेवा, कुंकुमार्चन, पूर्णाहुती, माध्यान महापूजा, अन्न संतार्पण, दुर्गा नमस्कार, रंगपूजा, रात्रीपूजा, दीपलंकार सेवा, रामनाम पठण, रात्री भजन यांसह दि. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दांडियाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
शाडू मातीपासून साकारली राजस मूर्ती
कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात शारदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी देवी सरस्वतीची सुमारे साडेचार फूट उंचीची राजस मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाडू माती कर्नाटकातूनच पुण्यात आणण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील कलाकारांनी ही मूर्ती घडविली आहे.



















