दौंडमधील विक्रेत्याला एमपीडीएचा दणका
marathinews24.com
पुणे – हातभट्टी विक्रेत्याविरूद्ध थेट एमपीडीएनुसार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संबंधित विक्रेता दौंड तालुक्यातील असून, कारवाईच्या दणक्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. अजित महादेव मासाळ (वय ३७ रा. लिंगमाळ, दापोडी ता. दौड) असे कारवाई केलेल्या हातभट्टी विक्रेत्याचे नाव आहे.
पुण्यात पोलीस अन सराईतामध्ये सिनेस्टाईल गोळीबार – सविस्तर बातमी
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दापोडी (ता. दौड) लिंगमाळ येथे राहणारा अजित महादेव मासाळ याच्याविरुध्द यापुर्वी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करुन लिंगमाळ, दापोडी तसेच आसपासचे गावात वेगवेगळया ठिकाणी गावठी हातभटटी दारु विक्रीसाठी वाहतुक करणे, अवैध रित्या चोरुन गावठी हातभटटीचे दारु विक्रीचे गुत्ते चालविण्याचे ६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव यवत ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांना पाठविला होता. संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार सराईत अजित मासाळ याला कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले.
सराईत अजित मासाळ याच्या स्थानबध्दतेचे आदेश प्राप्त होताच यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेतला. १९ मे रोजी त्याला ताब्यात घेउन अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, उपनिरीक्षव किशोर वागज, महेश बनकर, गणेश धनवे, संतोष भापकर, परशुराम म्हस्के, अमोल भुजबळ यांनी केली.
अवैध धंदेवाल्याविरूद्ध मोहिम- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावठी हातभटटीचे दारुची निर्मीती करणारे, हातभटटीचे दारुची चोरुन वाहतूक करणारे, दारुचे गुत्ते चोरुन चालविणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे, जुगार चालविणार्यांची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली आहे. त्यानुसार हातभट्टीवाले रेकॉर्डवरील सराईतांविरूद्ध एम.पी.डी.ए कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली जात आहे.
























