सांगलीतील दोघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने एका तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सांगलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वारजे परिसरात दुचाकीस्वार तरूणाला लुटले – सविस्तर बातमी
तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी धनकवडीतील मोहननगर भागात राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी तरुणीला एका कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले होते. गुंतवणुकीवर एका वर्षात दुप्पट परतावा देतो, असे आमिष आरोपींनी तरुणीला दाखविले होते. तरुणीने चार लाख ११ हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर आरोपींनी तरुणीला परतावा दिला नाही, तसेच मूळ मुद्दलही दिली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.




















