जमदेशपुरातून मुलीला घेतले ताब्यात
marathinews24.com
पुणे – घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी वडिलांनी तिच्या फोटोसह माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. मात्र, संबंधित क्रमांकावर एकाने फोन करून मुलगी आपल्या ताब्यात असून, मोबाइलवर युपीआय स्कॅनर पाठवून पैशांची मागणी केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी घटनेची तत्काळ दखल घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुलीचा शोध घेतला. झारखंडमधील जमशेदपूरमध्ये मुलीला सुखरूपरित्या ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात पावसाने दुचाकीस्वारांची दैना, गाड्या घसरल्या – सविस्तर बातमी
तक्रारदार मूळचे बिहारमधील असून, कामानिमित्त कोंढव्यातील काकडे वस्तीवर राहायला आहेत. १८ जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांची १७ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. याप्रकरणी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यासोबतच मुलीचा फोटो, स्वतःचा मोबाइल क्रमांक सोशल मीडियावर व्हायरल करीत माहिती देण्याचे आवाहन केले. याप्रकरणी पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात असताना, एकाने तक्रारदाराला व्हिडिओ कॉल केला. तुम्ही पोलीस स्टेशनला काय करीत आहात, तुमची मुलगी आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधिताने तक्रारदाराच्या व्हॉटसअॅपवर युपीआय स्कॅनर पाठवून पैशांची मागणी केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या शोधार्थ पथकांची नियुक्ती केली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार अल्पवयीनमुलगी आझाद हिंद एक्सप्रेसने कलकत्ताकडे जाणार्या रेल्वेमध्ये बसल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे टाटानगर, जमशेदपूरात पोहोचणार असल्याची माहिती मिळताच पथकाने रेल्वे पोलीस, टीसीसोबत संपर्क साधला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मुलीचा शोध घेउन तिला ताब्यात घेतले. कोंढवा पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत कुटूंबियाच्या स्वाधीन केले आहे. ही कामगिरी आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त गौहर हसन, एसीपी नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, रवींद्र चिप्पा, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, राहूल रासगे यांनी केली.



















