संगणक अभियंता जुबेर हंगरगेकरच्या पोलीस कोठडीत वाढ
marathinews24.com
पुणे – दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याच्याकडून एक मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. मोबाइलमध्ये एक पाकिस्तानी क्रमांक सापडला आहे. जुबेरच्या पोलीस कोठडीत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मंगळवारी दिले.
पुण्यातील कायदा सुव्यवस्था गंभीर- खासदार सुळे – सविस्तर बातमी
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर (वय ३२) याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यात वास्तव्यास संगणक अभियंता तरुणाला अटक केली. एटीएसच्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आली. जुबेर मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसचे अधिकारी अनिल शेवाळे यांनी न्यायालयात तपास अहवाल सादर केला. विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी बाजू मांडली. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, जुबेरच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील फरगडे यांनी युक्तिवादात केली.
‘जुबेर हा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आहे. त्याला अटक झाल्याची माहिती मिळताच साथीदारांनी दहशवादी विचारधारेची प्रसार करणारी पुस्तके, तसेच अन्य कागदपत्रे काळेपडळ येथील एका मदरशाच्या मोकळ्या जागेत जाळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याचा मोबाइल, तसेच लॅपटाॅपमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. लॅपटाॅपमध्ये काही पीडीएफ फाइल, समाज माध्यमातील संवादात काही सांकेतिक शब्दांचा वापर झाल्याची शक्यता आहे. जुबेरच्या एका साथीदाराच्या घरातून २ लाख ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोणी दिली, तसेच त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता?, यादृष्टीने तपास सुरू आहे. जुबेरने कोंढव्यातील प्रार्थनास्थळाच्या बाहेर ‘क्यूआर कोड’ लावून स्वत:च्या खात्यावर पैसे जमा करुन घेतले. जुबेर धार्मिक विषयांवर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घ्यायचा. त्यांना तो स्मार्टवाॅच, लॅपटाॅप, टॅब अशी बक्षीसे द्यायचा. त्याच्या संपर्कात किती जण होते, यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीत वाढ करावी’, असे ॲड. फरगडे यांनी युक्तिवादात सांगितले.
आरोपीचे तपास असहकार्य
जुबेर वापरत असलेला जुना मोबाइल संच त्यच्या साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात आला. या मोबाइल संचात पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमानमधील पाच जणांचे संपर्क क्रमांक आहेत. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र, तो तपासात सहकार्य करत नसून, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, जुबेरकडे न्यायालायाने विचारणा केली. तेव्हा पुरेशी झोप मिळत नसल्याची तक्रार त्याने केली.
जुबेरच्या साथीदारांचे जबाब
जुबेरच्या संपर्कात असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला आले.




















