आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
marathinews24.com
पुणे – शहरातील दूध संकलन व पशुखाद्य व्यावसायिकाची गुंतवणुकीच्या आमिषाने १०४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी बारामती परिसरातील व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पशुखाद्य, दूधसंकलन क्षेत्रातील व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक खराडी भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बारामतीतील जळोची भागात वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी १० बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी व्यावसायिक कामानिमित्त २०२२ मध्ये ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १०४ कोटी २४ लाख ११ हजार रुपये घेतले. गुंतवणूक केल्यानंतर व्यावसायिकाला परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा सुरू केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पाेलिसांकडे तक्रार दिली.
आरोपींविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.




















