नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी
marathinews24.com
पुणे – गुटखा बंदी केल्यानंतरही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहे. नागरिकांनी पानपट्टी, किराणा दुकानात होत असलेल्या गुटखा विक्रीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
प्रवासी महिलांसह तिघांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
शहरातील पानपट्टी, किराणा माल दुकानात गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. गुटखा बंदी केल्यानंतर राज्यात परराज्यातून छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीस पाठविला जातो. उपनगरातील गोदामात गुटख्याची साठवणूक केली जाते. तेथून शहरात छोट्या दुकानात गुटखा विक्रीस पाठविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यापूर्वी पोलिसांनी महामार्गावर गुटखा तस्करी करणारे वाहने अडवून कारवाई केली आहे.
कारवाई केल्यानंतर छुप्या पद्धतीने शहरात गुटखा विक्रीस पाठविला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता नागरिकांना गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी, असे आवाहन केले आहे.
गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी, तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना दिले आहेत. गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष (डायल ११२ किंवा १००) या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.



















