दहशतवादी संघटनेचे पुणे मॉड्युल

दहशतवादी संघटनेचे पुणे मॉड्युल

अभियंत्यासह उच्च शिक्षितांवर धर्मांधतेचे जाळे

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक ओळखीसह शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे शहरात दहशतवादी संघटनेचे मॉड्युल पुन्हा एकदा फोफावत चालले असल्याचे दिसून आले आहे. दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंत्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने नुकतेच पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. तर यापुर्वीही राष्ट्रीय तपास यंत्रणेने चाकण, कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढव्यातील इसिसचे मॉड्युल उध्वस्त केले होते. दहशवादी संघटनांकडून उच्चशिक्षितांना टार्गेट करुन ब्रेनवॉशद्वारे देशविरोधी कारवाया घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यापुर्वीही पुण्यात इसिसचे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले होते.

पुण्यात तोतया आयपीएसचे बिंग फुटले – सविस्तर बातमी 

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ९ ऑक्टोबरला कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर कोंढव्यात वास्तव्यास संगणक अभियंता तरुणाला अटक केली होती. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. झुबेर हंगरगेकर (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल केला आहे. झुबेर मूळचा सोलापूरचा असून, तो उच्चशिक्षित आहे. तो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होता. एटीएसने १८ जणांना संशयावरुन ताब्यात घेत त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाइल जप्त केले. लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण केले असता, आरोपी जुबेर हा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली आणि मुंबईच्या पथकासह महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने सव्वा पाच वर्षांपुर्वी पुण्यातील येरवडातून सादीया अन्वर शेख आणि कोंढव्यातून नबील सिद्धीकी खत्री यांना अटक केली होती. त्यांच्या कॉलदरम्यान काही संशयितांचे फोन टॅप केले असता, त्यांचा इसिसची संबंध असल्याचे उघडकीस आले. नबील खत्री पुण्यात व्यायामशाळा चालवित होता. तर सदिया शेख बारामतीतील महाविद्यालयात मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होती. इसिसच्या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या आयएसकेपीशी संबंध असल्यामुळे दिल्ली पोलिसांना कश्मिरी दाम्पत्याला अटक केली होती. त्यांच्या संपर्कात सादिया आणि नबील असल्याचे निष्पन्न झाले होते.

पुण्यात जुलै २०२३ मध्ये पकडलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. कोंढवा भागात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बॉम्ब स्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. बॉम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण त्यांनी कोंढव्यात घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोट केले होते. तसेच शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.

उच्चशिक्षित मुस्लीम तरुण-तरुणी लक्ष्य

उच्च शिक्षित मुस्लीम तरुण-तरुणींना इसिसने टार्गेट केल्याचे उघडकीस आले होते. वेगवेगळी आमिषे दाखवून संघटनेच्या जाळ्यात ओढण्याचे काम दहशतवादी संघटना करीत होत्या. आमिषाला बळी पडून उच्चशिक्षित तरुण-तरुणी इसिसच्या जाळ्यात अडकले जातात. इस्लामबाबत अनेक खोटे व्हिडिओ त्यांना दाखविले जात असल्याचे तपासात उघडकीस आले. बे्रनवॉशमुळे करियर सोडून संबंधित जिहादसाठी तयार होतात. त्यानंतर त्यांच्यामार्फत देश-विदेशात घातपाती कारवाया यापुर्वी घडविल्याचे दिसून आले होते.

टेक्नॉसॅव्ही यंत्रणा कधी येणार

दहशतवादी संघटनांकडून शहरात छुप्या पद्धतीने काम केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉसॅव्ही प्रणालीचा वापर केला जात नाही. त्यामुळे संशयित दहशतवाद्याचे फावले असून, सध्यास्थितीत तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीने वापर संबंधित दहशतवाद्यांकडून केला जात आहे. तुलनेत स्थानिक पोलीस आणि इतर तपास यंत्रणाकडील उपकरणांची वाणवा चिंतनीय आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×