सुप्रिया सुळेंच्या आरोपांनंतर आयुक्तांनी पाठवले पत्र
marathinews24.com
पुणे – शहरात सलग घडलेल्या खून, गोळीबार, कोयत्याने मारहाणीच्या घटना आणि वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठत असताना, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मात्र पुण्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला आहे.
पुण्यात २२५ ठिकाणीचे सीसीटीव्ही तपासून सराईतांचा शोध – सविस्तर बातमी
खासदार सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुळे यांना सविस्तर पत्र पाठवून पुण्यात कायदा सुव्यवस्थेबाबत सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पोलिस आयुक्तांनी २०२५ आणि २०२६ या वर्षातील गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीचा उल्लेख करीत चालू वर्षात गुन्ह्यांत घट झाल्याचे म्हटले आहे.
आयुक्तांनी पत्रात दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये बहुतांश प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, साखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, दुखापत, बलात्कार आणि विनयभंग यांसारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रात पोलिस आयुक्तांनी मे २०२६ मध्ये अवघ्या दहा दिवसांत पाच गंभीर घटना घडल्याचे मान्य केले आहे. या घटनांमुळे गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन, वाढीव गस्त आणि विविध प्रतिबंधात्मक कारवाया राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गोळीबार प्रकरणाचा उल्लेख करताना आयुक्तांनी पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी व्यक्तीचे प्राण वाचल्याचा दावा केला आहे. रात्रीची गस्त, जीपीएस आधारित देखरेख आणि पोलिसांची दृश्यमान उपस्थिती यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
पोलिस आयुक्तांच्या पत्रातील ठळक दावे
● खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये सुमारे २७ टक्के घट
● सोनसाखळी चोरीत ५६ टक्के, जबरी चोरीत ३६ टक्के घट
● वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट
● मे महिन्यातील पाच गंभीर घटनांनंतर विशेष कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढविली
पोलिस आयुक्तांच्या पत्रातील आकडेवारीनुसार पुणे अधिक सुरक्षित होत असल्याचे चित्र आहे. मात्र शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाढलेली गुन्हेगारांची वर्दळ, भररस्त्यातील हल्ले आणि वारंवार घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांच्या मनातील असुरक्षितता अद्याप कमी झालेली नाही, असे चित्र आहे. त्यामुळे ‘गुन्हेगारी घटली’ हा दावा आणि नागरिकांचा अनुभव वेगळे असल्याचे चित्र आहे.
सीपींना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची सुळेंनी केलेली मागणी
पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूकांडानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत पुणे पोलिस आणि पोलिस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत, पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली होती. तसेच, त्यांनी ‘एनसीआरबी’च्या अहवालात गुन्ह्यांबाबत पुणे शहराचा महानगरांत पाचवा क्रमांक असल्याचे म्हटले होते. त्यावर ही वस्तुस्थिती नसल्याचे पोलिस आयुक्तांनी सुळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.






















