कोथरूडमध्ये तरूणावर केला होता गोळीबार
marathinews24.com
पुणे– किरकोळ कारणावरून तरूणावर गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या गँगमधील शुटरसह गांजा विक्रेत्या तस्कराला खंडणी विरोधी पथक दोनने नर्हेतून अटक केली आहे. १७ सप्टेंबरला टोळक्याने तरूणावर गोळीबार केला होता. त्यानंतर संबंधित आरोपी पसार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात पथकाला यश मिळाले आहे. मुसाब शेख (वय ३४, रा. नर्हे) आणि तेजस डांगी (वय ३३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाने दुचाकीला जाण्यास रस्ता दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीतून सराईत निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी एकावर गोळीबार केला. त्यामुळे संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर काही अंतरावर टोळीने एकावर वार केल्याची घटना १७ सप्टेंबरला कोथरूडमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करीत त्यांची धिंडही काढली होती. त्यातील आरोपी मुसाब शेख पसार झाला होता. तो नर्हेत असल्याची माहिती पोलीस अमलदार अमोल घावटे यांना मिळाली.
खंडणी विरोधी पथक दोनने नर्हेत धाव घेत आरोपी मुसाब शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत तेजस डांगी या गांजा तस्करालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, अमोल राउत, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, गणेश खरात यांनी केली.
कुख्यात नीलेश घायवळविरूद्ध कारवाईने सराईत गायब
कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीविरूद्ध पोलिसांनी गुन्ह्यांची मालिका सुरू केली आहे. त्याच्याविरूद्ध थेट मोक्का कारवाई करीत आतापर्यंत ६ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे दादागिरीसह दहशत माजवणार्या सराईतांसह टोळ्या अंडरग्राउंड झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सराईतांविरूद्ध होणारी कारवाईचा वेग कायम ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



















