६ राऊंड फायर करीत केला खून
marathinews24.com
पुणे – शहरातील कोंढव्यात तरुणावर पिस्तुलातून तब्बल ६ गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. १) दुपारी घडली. प्राथमिक तपासात टोळीयुद्धातून तरुणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेश काळे (वय २९, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. कोंढवा परिसरातून गणेश काळे शनिवारी दुपारी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवून त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करून त्याचा खून केला आहे. दिवसा- ढवळ्या झालेल्या खुनामुळे पुणे हादरले असून, गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
दिवाळीनंतर पुण्यात चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी
तरुणावर झालेल्या गोळीबाराची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेश काळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. दरम्यान, खून झालेला गणेश काळे हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ आहे. त्याचा खून टोळीयुद्धातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेतीली टोळीयुद्धातून आंदेकर टोळीने आयुष कोमकर याच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारात आयुषचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नीलेश घायवळ टोळीतील सराइतांनी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात तरुणावर गोळीबार केला होता, तसेच संबंधित भागात थांबलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन दहशत माजविली होती. संबंधित गुन्ह्यात कुख्यात नीलेश घायवळ परदेशात पसार असून, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.



















