Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचे २०३० पर्यंत उद्दिष्ट

एचपीव्ही लसीकरण मोहिमेला पुणे जिल्ह्यात सुरुवात; ९८ हजार मुलींना लाभ अपेक्षित

marathinews24.com

पुणे – जगभरातील लाखो महिला गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहेत. गर्भाशयाच्या खालच्या टोकाला ‘सर्व्हिक्स’ म्हणतात आणि त्या भागात होणाऱ्या कर्करोगाला गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणतात. जवळपास ९९.७ टक्के प्रकरणे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) या विषाणूमुळे होतात. या विषाणूचा दीर्घकाळ टिकणारा संसर्ग पुढे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकत सन २०३० पर्यंत गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानातील अजमेर येथून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्चपासून तर पुणे जिल्ह्यात ९ मार्चपासून एचपीव्ही लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शास्त्रीय माहितीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी – सविस्तर बातमी

भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. सन २०२४ च्या अंदाजानुसार भारतात ७८ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून या आजारामुळे ४२ हजार ३९२ महिलांचा मृत्यू झाला आहे. २०२२ मधील वयानुसार प्रमाणित आकडेवारीनुसार दर एक लाख महिलांमागे ११.६ महिलांमध्ये हा कर्करोग आढळतो, तर मृत्यूदर दर एक लाख महिलांमागे ५.१ इतका आहे.

एचपीव्ही हा ‘पॅपिलोमाविरिडे’ कुटुंबातील दुहेरी धागा असलेला डीएनए विषाणू आहे. या विषाणूचे २०० हून अधिक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार कमी धोका असलेले तर काही प्रकार कर्करोग निर्माण करण्याची जास्त शक्यता असलेले असतात. सध्या १६, १८, ४५, ३३, ५८, ३१, ५२, ३५, ५९, ३९, ५६, ५१, ६८, ७३, २६, ६९ आणि ८२ असे एकूण १७ प्रकार कर्करोगाशी संबंधित असल्याचे आढळले आहे. यापैकी एचपीव्ही १६ आणि १८ हे दोन प्रकार सर्वाधिक धोकादायक असून जगभरातील सुमारे ७७ टक्के आणि भारतातील ८३ टक्के गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांसाठी हे दोन प्रकार प्रमुख कारणीभूत ठरतात.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र आजार वाढल्यास गर्भाशय मुखावर गाठ किंवा वाढ दिसू शकते आणि ती योनीमार्गापर्यंत पसरू शकते. ओटीपोटात वेदना होणे, शरीरसंबंधावेळी वेदना होणे, फिस्टुला तयार होणे, सायटिकाचा त्रास होणे किंवा पायात कळा येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

एचपीव्ही संसर्ग हा पुनरुत्पादन मार्गातील सर्वात सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग मानला जातो. पुरुष आणि महिलांमध्ये या संसर्गामुळे विविध व्याधी होऊ शकतात. बहुतेक वेळा हा संसर्ग कोणतीही लक्षणे न दाखवता १ ते २ वर्षांत कमी होतो. मात्र काही विशिष्ट प्रकारांचा संसर्ग दीर्घकाळ टिकून राहिल्यास कर्करोगपूर्व स्थिती (सीआयएन-१, सीआयएन-२, सीआयएन-३) निर्माण होऊन पुढे गंभीर कर्करोग होण्याची शक्यता असते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबरोबरच गुदद्वार, घसा, योनीमार्ग आणि लिंगाचा कर्करोगही एचपीव्ही संसर्गामुळे होऊ शकतो.

या आजाराचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने निर्मूलन करण्यासाठी जागतिक स्तरावर काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. दर एक लाख महिला-वर्षांमागे चारपेक्षा कमी रुग्णांचे प्रमाण राखणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी २०३० पर्यंत १५ वर्षांखालील मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरणाचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेणे, ३५ वर्षांपर्यंतच्या महिलांपैकी किमान ७० टक्के महिलांची तपासणी करणे आणि ४५ व्या वर्षी पुन्हा तपासणी करणे तसेच तपासणीमध्ये आजार आढळलेल्या ९० टक्के महिलांवर वेळेवर उपचार करणे, ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये एचपीव्ही लसीचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एचपीव्ही लसीकरणाचा मुख्य उद्देश गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करणे हा आहे. एचपीव्हीशी संबंधित सर्व कर्करोगांपैकी सुमारे ८२ टक्के कर्करोग गर्भाशय मुखाचे असतात. मुली लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी लसीकरण केल्यास या कर्करोगाचा प्रतिबंध सर्वाधिक प्रभावीपणे करता येतो.

क्वाड्रिव्हॅलेंट एचपीव्ही लस (गार्डासिल) ही द्रव स्वरूपातील लस असून १४ वर्षे वयोगटातील मुलींना डाव्या हाताच्या वरच्या भागातील स्नायूमध्ये ०.५ मिलीचा एकच डोस दिला जातो. भारत सरकारने दोन किंवा तीन डोसच्या वेळापत्रकाऐवजी ‘एक डोस’ वेळापत्रक स्वीकारले आहे. संशोधनानुसार हा एक डोस दोन डोसइतकाच प्रभावी संरक्षण देतो आणि दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण करतो.

पुणे जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४१ हजार ३८७, पुणे महानगरपालिकेतील ३३ हजार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील २४ हजार ५२० अशा एकूण ९८ हजार ९०७ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

जिल्हा परिषद पुणेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १४ वर्षे वयोगटातील मुलींचे (ज्यांनी चौदावा वाढदिवस साजरा केला आहे परंतु पंधरावा वाढदिवस अद्याप झालेला नाही) ९ मार्चपासून लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन लसीकरण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. याकामी शालेय शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी १०४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×