बस जळून खाक
marathinews24.com
बीड – जिल्ह्यातील केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सांगवी-सारणी वळणावर जळगावहून लातूरकडे जात असलेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना दि.१६ मार्चला सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. काही क्षणातच बसने पेट घेतल्याने अपघातात २८ प्रवासी जखमी झाले. आगीमुळे बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.
पुण्यात पानविक्रीच्या आडून ग्राहकांना खाऊ घातले अमली पदार्थ – सविस्तर बातमी
प्रवासी बसमधून बाहेर पडत असतानाच आग लागल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र प्रवाशांचे सर्व सामान आगीत भस्मसात झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इमानदार, रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. जखमी प्रवाशांवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इंधनाची टाकी फुटल्याने लागलेल्या या भीषण आगीने मध्यरात्री रस्त्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.






















