फसवणुकीचा गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून राज्य सरकारची नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधिताने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोग्य सेवा (परिवहन) विभागात नियुक्ती मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात राम भाऊसाहेब पाटील (वय २८, रा. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी सीमा भैरवनाथ हुलगे (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार ३० जानेवारी २०२५ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या कार्यालयात घडला.’
कुत्र्याला मारहाण; विरोध केल्यावर दांपत्याला धमकी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील याने दिव्यांग प्रमाणपत्र अनधिकृतरीत्या मिळवून ते सरकारकडे सादर केले. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने कार्यदेशक (गट-क) पदावर आरोग्य सेवा (परिवहन) विभागात नोकरी मिळवली. दरम्यान, संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्या वेळी आरोपीनेच बनावट पत्र तयार करून प्रमाणपत्र वैध असल्याचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तसेच, ‘MH0230019970241465’ (१३ डिसेंबर २०२२) क्रमांकाचे दिव्यांग प्रमाणपत्र वैध असल्याचे खोटे दाखवत कार्यालयात सादर करण्यात आले होते. या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहेत.





















