सार्वजनिक जीवनात विवेकाचे अधिष्ठान हवे : अविनाश पाटील
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे गांधी दर्शन शिबिर गांधी भवन, कोथरूड येथे उत्साहात पार पडले. रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत भरविण्यात आलेल्या या शिबिरात गांधी विचारांच्या सखोल अभ्यासासोबतच आधुनिक सामाजिक आव्हानांवर विचारमंथन झाले.
‘पुरुषोत्तम’मध्ये भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया : सुहास जोशी – सविस्तर बातमी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील (भारतीय मातीतला विवेकवाद), प्रा.राम पुनियानी(गांधी का धर्मविचार) यावर मार्गदर्शन केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. अँड – स्वप्नील तोंडे यांनी स्वागत केले.
शिबिराचे प्रमुख वक्ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, ‘विवेकवादाचे अधिष्ठान असेल तरच समाजकारण, राजकारण यशस्वी होऊ शकते. पाश्चिमात्य तत्वज्ञानातून विवेक वादाची चर्चा झाली असली तरी भारतीय मातीत देखील विवेकी मांडणी झाली आहे.त्याविषयी संवाद झाला पाहिजे.प्राचीन भारतीय परंपरेत काही दर्शने सांगितली आहेत. मोक्षवाद सांगितला आहे.अज्ञान दूर करण्यासाठी विवेकाचा मार्ग सांगितला पाहिजे.विवेकाचे अधिष्ठान प्राचीन भारतीय तत्वज्ञानात आहे.नैतिक आचरणाचे महत्व विवेकवादात सांगितले आहे. त्यातूनच मोक्षाकडे झाली पाहिजे. चार्वाकवादातून वैज्ञानिक अधिष्ठानाचा पाया घातला गेला. चिकित्सेचा आग्रह धरला गेला. बुद्ध तत्वज्ञानात कर्मकांड, रुढी, अंधश्रध्दाला विरोध करण्यात आला. जैन, मुस्लीम,शीख विचारात विवेक वापरण्याचा सल्ला आढळतो.वारकरी परंपरेने, नाथ संप्रदायाने, कबीर विचाराने, बसवेश्वर विचारांनी विवेकवाद या भूमीत वाढवला.
संविधानात सर्वसमावेशक, सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या विवेकवादाचे प्रतिबिंब पडले आहे.जगातील खूप कमी देशात इतकी स्पष्ट भूमिका घेतली गेली आहे. राज्यसंस्था,धर्मसंस्था वेगळी असली पाहिजे,हा विचार म्हणजे आधुनिक विवेकवादच आहे. समाजात शांतता, सुव्यवस्था हवी असेल तर विवेकवाद अपरिहार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. राम पुनियानी यांनी ‘गांधी का धर्मविचार’ या विषयावर विचारमंथन करताना गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचा सखोल उलगडा केला. तत्पूर्वी, अविनाश पाटील यांनी ‘भारतीय मातीतला विवेकवाद’ या विषयावर विवेकशीलतेची गरज अधोरेखित केली,
अन्वर राजन म्हणाले, सोशल मीडियावर महात्मा गांधी यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचे मानवते साठी केलेले योगदान नव्याने समोर यावे, यासाठी गांधी दर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. प्रचलित समस्यावर चर्चा केली जाते, त्यातून गांधी विचारांचे महत्व कळायला मदत होते.
कार्यक्रमात डॉ रमा सप्तर्षी, ज्ञानेश्वर मोळक, अड – स्वप्निल तोंडे, तेजस भालेराव आदी मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी असे मत व्यक्त केले की अशा विचारप्रवर्तक उपक्रमांमुळे नव्या पिढीत लोकशाही, अहिंसा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ होते.























