साडेसात लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – आयडीबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकाने सादर केलेला आरटीजीएस फॉर्म चोरून त्यात फेरफार करत साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरणकुमार मारुती व्हटकर (वय ४७, रा. बसीलिओ सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल हरिभाऊ कळलोसे (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आंदोलन भोवले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँकेच्या गुजरात कॉलनी शाखेत १७ मार्चला दुपारी दीडच्या सुमारास प्रकार घडला. खातेदार सुषमा सुशील नरखेडे यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून ७ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करण्यासाठी फॉर्म आणि धनादेश कस्टमर सर्व्हिस टेबलवरील ट्रेमध्ये ठेवले होते. संधीचा फायदा घेत आरोपीने हा फॉर्म व धनादेश चोरून त्यात फेरफार केला. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने फॉर्मवर स्वतःचे नाव व बँक खात्याचा क्रमांक नमूद केला. त्यानंतर हा बनावट आरटीजीएस फॉर्म कॅश काऊंटरवर सादर करून रक्कम वळवून घेत बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीचा शोधण्याचे काम सुरू आहे.























