पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी ततब्बल ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
marathinews24.com
पुणे – राज्य पोलीस दलाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी (दि. ५ ) गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्ताने पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्ला यांनी उपस्थितांना सूचना दिल्या. गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी ततब्बल ८ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे.
पुण्यात देखावे पाहणाऱ्या महिलांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी
यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक तयार केले आहे. वेळा पत्रकानुसार मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून वेळेत विसर्जन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विसर्जन सोहळ्याच्या पाश्वर्भूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे, निखील पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताचा आढावा घेऊन सूचना केल्या. विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसंचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्या राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.






















