लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे – तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. भरत पोपट गायकवाड (वय ४६, रा. कान्हूरमेसाई, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाइन फसवणूक – सविस्तर बातमी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार हे शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. तक्रारदाराच्या जागेत गावातील काही जणांनी अतिक्रमण केले होते. तेथे घर बांधण्यात आले होते, तसेच ग्रामसेवकाकडून ‘८ अ’ उतारा तयार करुन घेण्यात आला होता. ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे न पाहता उतारा तयार करुन दिला होता. याबाबत तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरुर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित अर्ज कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घासले यांच्याकडे पाठविला होता. अर्जाची चौकशी करुन गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गायकवाडने तक्रारदाराकडे सुरुवातीला १० ते १५ हजार रुपये मागितले होते. याबाबत तक्रारदाराने तक्रार दिली होती. तडजोडीत गायकवाड याला दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (१ एप्रिल) सापळा लावून गायकवाड याला पकडण्यात आले. रात्री उशीरा गायकवाडला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सतीश वाळके आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास कत आहेत.
























